Monday, May 17, 2010

ते माझं स्त्रीत्वं

माझ्या आईनी अलगद माझ्या ओंजळीत टाकलेलं
ते माझं स्त्रीत्वं?
का सिमोन दि बोव्हा च्या तत्वज्ञानातून बरचसं न कळलेलं,
ते माझं स्त्रीत्वं?

स्त्रीमुक्तीवादाच्या कचाट्यातून स्वतःला सोडवू पाहणार,
ते माझं स्त्रीत्वं?
का असमानतेच्या भावनेनी ज्वालेसारख पेटून उठणारं,
ते माझं स्त्रीत्वं?

दर महिन्याला वेदना साहून त्रासलेल, विटलेल,
ते माझं स्त्रीत्वं?
का मातृत्वाच्या देवत्वानी उन्मत्त झालेलं,
ते माझं स्त्रीत्वं?
शृंगाराच्या हरक्षणी समर्पित होणारं,
ते माझं स्त्रीत्वं?
का याचक होऊन अंतिम क्षणाचं दान मागणारं,
ते माझं स्त्रीत्वं?

मोगऱ्याच्या वासानी वेडापिस होणारं
ते माझं स्त्रीत्वं?
का हिरीरीनी टाकीलाचे shots मोजणार,
ते माझं स्त्रीत्वं?

न साहून फुटलेल्या पान्ह्यात भिजणार ,
ते माझं स्त्रीत्वं?
का उभ्यानी मुतता येत नाही म्हणून वैतागणार,
ते माझं स्त्रीत्वं?

त्याच्या नजरेतून मला गवसतं,
ते माझं स्त्रीत्वं?
का माझ्या कणाकणातून पाझरत,
ते माझं स्त्रीत्वं?