Tuesday, April 27, 2010

न सुचलेल्या कवितेचं भूत

माझ्या न सुचलेल्या कवितेचं भूत रोज माझ्या मानगुटीवर बसतं
गोंधळलेल्या,काळ्या,अशांत,जीवघेण्या रात्री.
जेव्हा माझ्या अपुर्या स्वप्नांचे,अतृप्त वासनांचे,फसलेल्या यमकांचे,चुकलेल्या गणितांचे,अस्फुट चित्कारांचे घाव बसतात माझ्या मनावर.

जगण्याच्या चौकटी आखताना आपसूक बाजूला सारलेलं,
आत आत कुठेतरी दाबलेलं,
पचवलंय असं वाटलेलं,
नाकारलंय असं मानलेलं,
'उद्या पाहू' च्या सदरात मोडलेलं.
स्वप्नाळू वगैरे डोळ्यांना न झेपलेलं,
मोडक्या खांद्यांना नं पेललेल
पंख बांधून पदरात लपवलेलं.
साखरेत घोळून पोटात दडवलेलं,
माझं, तुझं, तिचं, त्याचं...
सगळं पिशाच्च्यासारखा उभं ठाकतं समोर.
आणि म्हणतं, 'कविता तरी कर'

पण वांझ गायीसारखी मी मख्ख पहात राहते.
'कविता' नावाच्या याक्षिनिचा धावा करत,
'अजाण कवितेच्या वाटेला जाणाऱ्यांना' दरडावणाऱ्या आरतीप्रभूंचे नामस्मरण करत.
ट ला ट जोडणार्यांच्या नावाने बोटं मोडत,
मेघना पेठेच्या नागड्या, निर्भीड कवितेचा हेवा करत,
मर्ढेकर,कुसुमाग्रज,करंदीकरांचे पाय धरत.
मग स्वतःची समजूत काढते.
'तो फोर्म नाही माझा' असं म्हणत.
मग होते निद्रादेवीच्या आधीन.
सकाळी कोडगेपणाची शाल पांघरून आला दिवस सार्थकी लावते.
'मुलगी,मैत्रीण,बायको,प्रेयसी,आई' ....
सर्व भूमिकात अभिनयाची उंची गाठते.
आणि रोज रात्री त्या नं सुचलेल्या कवितेच्या भुताला बुद्धी नावाच्या मांत्रिकाकडे न्यायचं ठरवते.
पण ते मानगुटीवरून उतरेल तर नं??

No comments: